
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण या बाबी विचारात घेऊन मंदिर व परिसराची कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भीमाशंकरमंदिर भाविकांना दर्शनाकरिता ३१ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिराचे काम सुरू झाल्यापासून ९ जानेवारी ते ९ एप्रिल असे तीन महिने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विकासकामे अजूनही सुरू असल्याने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. दरम्यान पूर्वी तीन महिन्याचा कालावधी पुन्हा एक महिन्याने वाढवल्याने भीमाशंकर येथील स्थानिक हॉटेल व्यवसायिकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून मंदिर बंद असल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून शासनाने निदान मुखदर्शन तरी सुरू करावे अशी मागणी हॉटेल व्यवसाइक यांनी केली आहे.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी गर्दी आणि त्यासाठी आवश्यक सुविधा उभारणीसाठी मंदिराची विकासकामे सुरू आहेत. बांधकाम सुरू असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे धोकादायक आहे. ही कामे सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ९ जानेवारी ते ९ एप्रिलपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सभामंडपाचे सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असून घुमटाचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच मंदिराकडे जाणाऱ्या पायरीमार्गाचे काम प्रगतीत असून प्रवेशमार्ग बंद आहे. पावसाळ्यात येथे पावसाचे प्रमाण जास्त असते. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता विचारात घेता, त्यापूर्वी ही कामे जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मंदिर आता ३१ मेपर्यंत बंद राहणार आहे.

मात्र शासनाच्या या निर्णयावर स्थानिक नागरिक हॉटेल व्यवसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासन मनमानी पद्धतीने कारभार करत आहे शासनाने पहिल्यांदा तीन महिने भीमाशंकर मंदिर बंद राहणार असा निर्णय घेतला होता त्यानंतर स्थानिक हॉटेल व्यवसायिकाकडे देशभरातील भाविकांनी बुकिंग केले होते. मात्र अचानक परत एक महिना मंदिर बंद राहणार असा निर्णय घेतल्यामुळे या बुकिंग कॅन्सल झाले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठा फटका बसला असून हॉटेल व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कामगारांचे पगार, बँकेचे हप्ते कसे द्यायचे असा प्रश्न हॉटेल व्यवसाइक यांचे पुढे उपस्थित झाला आहे . ठेकेदार संथ गतीने काम करून सरकारची दिशाभूल करत आहे का ?असा प्रश्न देखील हॉटेल व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. तसेच भीमाशंकर मंदिर येथे येणारे भाविक पर्यटक यांच्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत असतो करवंद, बेलफुले, हार फुले, पेढे, मिठाई विक्री बंद असल्याने स्थानिक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने यातून तोडगा काढावा व भीमाशंकर मंदिर येथे मुखदर्शन सुरू करावे अशी मागणी हॉटेल व्यवसायिकांनी केली आहे.











