अवसरीची अवघ्या ८ वर्षांच्या बुद्धिबळपटू अन्वी दिपक हिंगे हिने जागतिक स्तरावर इतिहास रचत FIDE अंडर-९ मुलींच्या गटात वर्ल्ड नंबर १ स्थान पटकावले आहे. यासोबतच ती जगातील सर्वात लहान वयाची Woman Candidate Master (WCM) ठरली असून अंडर-९ वयोगटातील जगातील एकमेव WCM बनली आहे. महाराष्ट्र आणि भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या अन्वीने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ती महाराष्ट्र अंडर-७ मुलींची राज्य विजेती ठरली असून सध्या महाराष्ट्र अंडर-९ मुलींच्या राज्य स्पर्धेत उपविजेती आहे. राष्ट्रीय स्तरावर तिने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ती अंडर-८ गटातील उपविश्वविजेती (Vice World Champion) आहे. तसेच कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदक आणि वेस्टर्न एशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेत २ सुवर्ण व ४ रौप्य पदके जिंकून तिने भारताचे नाव उंचावले आहे. स्थानिक ते जागतिक स्तरापर्यंत प्रत्येक टप्प्यावर यश मिळवणारी अन्वी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

तिच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत प्रतिष्ठित Femina मासिकाच्या फेब्रुवारी–मार्च २०२६ अंकाच्या मुखपृष्ठावर भारतातील “Best U-10 Achievers of 2025” म्हणून तिची निवड करण्यात आली. एवढ्या लहान वयात राष्ट्रीय स्तरावरील अशा प्रतिष्ठित सन्मानाने तिच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. वेस्टर्न एशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेती ठरत अन्वीने WCM साठी आवश्यक नॉर्म आधीच पूर्ण केला होता. स्पेन दौऱ्यातील कामगिरीने तिच्या या ऐतिहासिक यशावर शिक्कामोर्तब केले. स्पेनमधील प्रतिष्ठित X Open Semana Santa San Vicente del Raspeig, Alicante स्पर्धेत तिने Group B मध्ये Female Champion किताब पटकावत ट्रॉफी आणि २०० युरो रोख पारितोषिक जिंकले. स्पेनमधील दोन स्पर्धांमध्ये तिने एकूण १९२ Elo गुणांची वाढ करत आपले अधिकृत FIDE रेटिंग १८२४ पर्यंत नेले आणि जागतिक क्रमवारीत नंबर १ स्थान मिळवले.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमदार सुनील शेळके यांनी तिचा सत्कार केला आहे. अन्वीला सिद्धांत गायकवाड आणि ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या प्रशिक्षणाचा तिच्या यशामध्ये मोठा वाटा आहे.
आपल्या यशाबद्दल अन्वी म्हणाली, “मला बुद्धिबळ खूप आवडते. प्रत्येक सामन्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा मी प्रयत्न करते. वर्ल्ड नंबर १ आणि सर्वात लहान WCM होणे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पुढेही भारतासाठी अजून मोठी यश मिळवायची आहेत.”
अन्वीच्या पालकांनी सांगितले, “हे यश एका स्पर्धेचे नसून अनेक वर्षांच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि प्रशिक्षक, शाळा व कुटुंबाच्या पाठिंब्याचे फळ आहे. अन्वीला वर्ल्ड नंबर १ होताना पाहणे आमच्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.”
अन्वीच्या या यशामुळे पुणे, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताचा गौरव वाढला असून भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यातील एक मोठे नाव म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.








