
मंचर (ता. आंबेगाव) येथे शुक्रवार दि. ३ रोजी अत्यंत धक्कादायक व हृदयद्रावक घटना घडली असून, आईनेच आपल्या मुलासह विहिरीत उडी मारून मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष लक्ष्मण बाणखेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पत्नी सौ. हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५, रा. लालबाग प्रेस्टीज ए विंग, मंचर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ८:३० वाजण्याच्या सुमारास लालबाग प्रेस्टीज येथील राहत्या घरी ही घटना घडली. प्रॉपर्टीच्या वादातून आरोपी महिलेने प्रथम आपल्या १३ वर्षीय मुलगी कु. परीज्ञा हिचा गळा वायरने आवळून, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा खून केल्याचा समज करून तिला घरात कुलूप लावून ठेवले. मात्र सुदैवाने मुलगी गंभीर जखमी अवस्थेत जिवंत असल्याचे पुढे समोर आले आहे. यानंतर आरोपीने आपल्या ६ वर्षीय मुलगा निहांत याला सोबत घेऊन तपनेश्वर मंदिराजवळील विहिरीकडे जाऊन त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने स्वतःसह विहिरीत उडी मारली. या घटनेत निहांत आशिष बाणखेले (वय ६) याचा मृत्यू झाला असून, आरोपी महिला बचावली आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी मुलगी परीज्ञा हिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत, या घटनेमुळे मंचर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आईकडूनच अशा प्रकारची अमानुष कृत्य घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.










