
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील गावालगतच्या रस्त्यावर विद्युत तारा लोंबकळत असल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर, आनंदा पोंदे, चंद्रकांत विरकर यांनी केली आहे.

पोंदेवाडी ते काठापूर या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटी करणाचे काम सुरू असल्याने रस्त्याची उंची वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या विद्युत वाहक तारा आता अत्यंत कमी उंचीवर, जवळजवळ हाताच्या अंतरावर लोंबकळत आहेत. यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या धोकादायक परिस्थितीकडे महावितरण ने दुर्लक्ष न करता तात्काळ विद्युत तारा उंचावण्याचे व सुरक्षिततेचे काम पूर्ण करावे, अशी मागणी पोंदेवाडी ग्रामस्थांनी केली आहे. अष्टविनायक रस्ता तसेच पारगाव कारखाना रस्ता जवळ असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनेही ये-जा करतात. त्यामुळे या वाहनांचा विद्युत तारांना स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच ट्रॅक्टर किंवा बैलगाडीतून वैरण नेताना देखील तारांना स्पर्श होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, जोरदार वाऱ्यामुळे विद्युत तारा हलत राहतात, त्यामुळे त्या तुटून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.










