
आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथे मेंढपाळ महिलेकडील मौल्यवान ऐवज हरविल्यानंतर पारगाव कारखाना पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत तपास पूर्ण करत पिशवी शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या घटनेमुळे पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे.

संगीता अंजबापू तिखोळे (वय ४०, रा. काठापूर बुद्रुक, ता. आंबेगाव; मूळ रा. पळशी वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या मेंढपाळ महिला रविवारी (दि. १९) घोडनदीच्या काठावर बकऱ्या चारत होत्या. यावेळी त्यांच्या कंबरेला खोचलेली कापडी पिशवी हरवली. त्या पिशवीमध्ये दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख ३८ हजार रुपये असा मौल्यवान ऐवज होता. घटनेनंतर तिखोळे यांनी तात्काळ पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश अभंग यांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली.

तपासादरम्यान संशयित व्यक्तींना चौकशीसाठी बोलवून पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. पोलिसांचा दबाव वाढताच संबंधित संशयिताने बुधवारी (दि. २२) हरवलेल्या ठिकाणीच पिशवी परत ठेवली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पिशवी ताब्यात घेतली व ती संगीता तिखोळे यांच्या स्वाधीन केली. या पिशवीत सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम मिळून अंदाजे सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज सुरक्षित मिळाल्याने संबंधित महिलेने समाधान व्यक्त केले. या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे पारगाव कारखाना पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे.









