
आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेच्या धाडसी प्रतिकारामुळे सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांचा दागिना चोरीपासून वाचला.

लोणी-पाबळ रस्त्यालगत बेल्हा-जेजुरी महामार्गावरील आपल्या दुकानात विजया ज्ञानेश्वर गायकवाड (वय ५५) या महिला बसल्या होत्या. बुधवारी (दि. १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तंबाखूची पुडी घेण्याचा बहाणा करून दुकानाजवळ येत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावण्याचा प्रयत्न केला.
यावेळी विजया गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत जोरदार प्रतिकार केला. त्यांनी चोरट्याच्या शर्टची कॉलर पकडल्याने घाबरलेल्या चोरट्याने गंठण जागेवरच टाकून दिले.

दुसरा साथीदार मोटारसायकल सुरू करून तयारच उभा असल्याने दोघेही पाबळच्या दिशेने पसार झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार जढर, पोलीस अंमलदार साळवे, पोलीस पाटील संदीप आढाव तसेच खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, नागरिकांनी किमती दागिने घालताना सतर्क राहावे तसेच अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असे आवाहन पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले आहे.










