
आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील चवरेमळा परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत १० वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कृष्णा प्रशांत चवरे असे मृत मुलाचे नाव असून तो अवघ्या चौथीत शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास कृष्णा हा आपल्या घराजवळून वाहणाऱ्या ओढ्या जवळ खेळत होता. खेळता खेळता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. ओढ्यातील पाण्यातून तो बाहेर येऊ शकला नाही आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, परिसरात आरडाओरडा सुरू झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कृष्णाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी मंचर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. कृष्णाच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कृष्णा हा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. अभ्यासात हुशार आणि मनमिळावू स्वभावामुळे तो शिक्षक आणि मित्रांमध्ये लाडका होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच गुरुवारी शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी शोकसभा घेऊन त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या हृदयद्रावक घटनेमुळे अवसरी बुद्रुक व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









