
नाशिक जिल्हयातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना गावठी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसांसह आळेफाटा पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील आळेफाटा परीसरात त्यांच्या बसस्थानक दोन इसम ताब्यात अग्निशस्त्र स्वतःकडे बाळगून रॉयल एनफिल्ड कंपनीच्या हंटर मॉडेल या गाडीवर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने, तपास सुरू केला असता गुन्हे शोध पथकाला मातोश्री कलेक्शन जवळ असलेल्या उसाच्या गुन्हाळाजवळ एक नंबर नसलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची हंटर मॉडेलची गाडी उभी दिसली व त्या ठिकाणी दोन इसम हे संशयीत रित्या बसलेले दिसल्यानंतर त्यांना चौकशी साठी ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे १) स्वप्नील सुनिल गोसावी (वय २५ वर्षे रा. जत्रा हॉटेल बळ मंदिराच्या पाठीमागे नाशिक जि. नाशिक), २) आकाश दिनेश कोठे (वय २९ वर्षे रा. नाशिक रोड, देवलाळी गाव, मालधक्का रोड, नाशिक) असे असल्याचे सांगीतले व स्वप्नील गोसावी याची अंगझडती घेतली असता त्याचे शर्टचे आत पाठी मागील बाजुस कमरेजवळ एक बॅरेल असलेली, सिल्व्हर रंगाची गावठी पिस्टल तसेच पिस्टलच्या मॅगजीनमध्ये ३ जिवंत काडतुसे मिळून आल्याने त्यांच्यावर अवैध शस्र बाळगणे असा गून्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये स्वप्नील गोसावी यांच्यावर नऊ गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल असुन, आकाश कोठे याच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मिळाली. सदर आरोपींकडून एक गावठी पिस्टल, ०३ जिवंत काडतुसे तसेच एक विना नंबरची रॉयल एनफिल्ड कंपनीची हंटर मॉडेलची गाडी असा एकूण ४,५९,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पुणे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक संदिप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमोद क्षीरसागर, पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, विनोद गायकवाड, अमित माळुंजे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.











