
कासार समाजातील विवाहइच्छुक तरुण-तरुणींना योग्य जोडीदार निवडता यावा, यासाठी पुण्यात भव्य-दिव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा कासार समाज विकास समिती आणि सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी ‘जीवनसाथी’ वधू-वर परिचय मेळावा पार पडणार आहे.

बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील वर्धमान सांस्कृतिक केंद्र,शत्रुंजय मंदिर येथे सकाळी ०९:०० वाजल्यापासून हा मेळावा सुरू होईल. संपूर्ण महाराष्ट्र तसेच देश-विदेशातील कासार समाजातील उमेदवारांसाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे अशी माहिती श्री अनिल भांडेकर यांनी दिली.
जास्तीत जास्त विवाह जमवणे हा मुख्य हेतू ठेवून या मेळाव्याची रचना अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. वधू-वरांना एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलता यावे यासाठी विशेष बैठक व्यवस्था (परिचय कक्ष) असेल. तसेच ‘टीम दोस्त’ ही तरुणांची टीम उमेदवारांमधील संवाद सुलभ करेल.परदेशात राहणारे समाजातील उमेदवारही या मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने थेट सहभागी होऊ शकणार आहेत.उमेदवार स्टेजवर परिचय देत असताना, त्यांच्या बॅकग्राउंडला मोठ्या स्क्रीनवर त्यांची संपूर्ण माहिती फ्लॅश केली जाईल.पालक आणि मुलांमध्ये विचारांची एकसूत्रता आणण्यासाठी समुपदेशन केले जाईल. याशिवाय ज्योतिष, कायदेतज्ज्ञ (वकील) आणि डॉक्टरांचे विशेष मार्गदर्शन वधू-वर व पालकांना मिळणार आहे. सुसज्ज हॉल, प्रशस्त पार्किंग आणि सर्वांसाठी सुग्रास जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांना www.punekasar.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती अनिल भांडेकर यांनी दिली.

या मेळाव्याचे पुणे जिल्हा कासार समाज विकास समिती आणि सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले असून मा. श्री राजेंद्र अचलारे, आनंद डांगरे, रमाकांत कानडे, अनिल भांडेकर, भास्कर अंदुरे, रंगनाथ उंडे, स्मिता धारूरकर, मंजुषा किवडे,स्वप्नील जुन्नरकर, रोहन उंडे, मंदार सासवडे व त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.










