
आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. वादळी पावसाने अनेक नागरिकांची घरे कोसळली असून पोल्ट्री शेड, जनावरांचे गोठे आणि शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत नागरिकांना धीर दिला.

शिवसेना नेते रमेशभाऊ येवले, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरूणभाऊ गिरे आणि युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह लाखणगाव परिसरातील बाधित भागाची पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व कुटुंबीयांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

अवकाळी पावसामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पोल्ट्री व्यवसायिकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. या संकटाच्या काळात शिवसेनेच्या वतीने विविध नुकसानग्रस्त कुटुंबांना दोन लाख रुपयांहून अधिक आर्थिक मदत देण्यात आली. रमेशभाऊ येवले यांच्या हस्ते ही मदत प्रदान करण्यात आली. यावेळी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकरी, पोल्ट्री व्यवसायिक आणि घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शासकीय मदत त्वरित द्यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. “संकटाच्या काळात शिवसेना सामान्य नागरिकांच्या पाठीशी कायम उभी राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यात युवासेना तालुका अध्यक्ष योगेश थोरात, माजी सरपंच महादेव कानसकर, मार्तंड टाव्हरे, नरेंद्र भागवत, किसन टाव्हरे, कारभारी गाडगे, महेश भोजने, भूषण रोडे, सोमनाथ भागवत, कैलास गाढवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











