
मंचर, ता. आंबेगाव : मंचर परिसरातील कॅफे 360 वर मंचर पोलिसांनी कारवाई करत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 296 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कॅफे चालकावर सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मंचर पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई योगेश परशुराम रोडे (ब. नं. 2921) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 20 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 1.45 वाजण्याच्या सुमारास मंचर गाव हद्दीतील कॅफे 360 मध्ये अवैध पार्टिशन करून पडदे लावण्यात आले होते. तसेच शाळा व महाविद्यालयातील मुला-मुलींना असभ्य व अश्लील वर्तन करण्यास मुभा देत कॅफेच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशन येथे स्टे. डा. नं. 30/2026 प्रमाणे दुपारी 2.53 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस हवालदार हगवणे (ब. नं. 2301) यांनी दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार जांभळे (ब. नं. 2138) करीत आहेत. या कारवाईमुळे मंचर परिसरातील कॅफे व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांनी इशारा दिला आहे.












