
मुख्य सभामंडपाच्या पुनर्बाधणीसह विविध सुरक्षा व सुविधा विकासकामे करण्यासाठी बंद असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर ३१ मे रोजी भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. ही कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यापासून बंद असलेल्या मंदिरात भाविकांना आता सुलभ दर्शन घेता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरातील गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ही कामे हाती घेण्यात आली होती. सुरुवातीला ९ जानेवारीपासून तीन महिने बंद ठेवण्याचे नियोजन होते, मात्र कामांच्या प्रगतीनुसार ही मुदत ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली. नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाढत्या संख्येला अनुरूप सुविधा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश होता. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २८८.१७ कोटी रुपयांचा निधीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

यामध्ये भव्य नवीन सभामंडप उभारणी, जुन्या सभामंडपाचे पूर्ण काढणे, पायरी मार्ग (स्टेप वेव्ह), प्रवेश-निर्गमन मार्गांची सुधारण, गर्दी नियंत्रण व्यवस्था, व्ह्यूइंग कॉरिडॉर, विश्रांती क्षेत्रे इत्यादींचा समावेश आहे. सभामंडपाचे काम पारंपरिक तंत्रज्ञान वापरून वेगाने पूर्ण करण्यात आले असून, सध्या ९० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, 31 मेपासून भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले होणार असल्याने उन्हाळी सुट्ट्यांच्या शेवटी भाविकांना ज्योतिर्लिंग दर्शन घेता येईल.











