
जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा–जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील धोकादायक एस कॉर्नरवर झालेल्या भीषण अपघातात जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय ५२) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंता गवारी हे त्यांच्या Honda City कारमधून बनकरफाट्याकडून जुन्नरकडे जात होते. त्याच वेळी पांगरीमाथ्याकडून येणाऱ्या हायवा वाहनाची गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर त्यांच्या कारशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कार अक्षरशः फिरून उलट दिशेला फेकली गेली. या अपघातात अनंता गवारी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महसूल विभागात शोककळा पसरली आहे.

अपघातात महसूल कर्मचारी विजय खारतोडे हे गंभीर जखमी झाले असून तुषार कोरडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. दोघांवरही उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक व पत्रकारांच्या मदतीने जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, हा अपघात केवळ वेग आणि वळणामुळे झाला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. एस कॉर्नर परिसरात यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्याची माहिती समोर येत असून या धोकादायक वळणावर सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.









