
आंबेगाव तालुक्यासह परिसरासाठी जीवनदायिनी ठरणार्या हुतात्मा बाबू गेणू सागर डिंभे धरणात सोमवारी (दि. १३) ३४.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १०.१६ टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे, यामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सद्यस्थितीत धरणातून मोठ्या प्रमाणावर सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे साठ्यात हळूहळू घट होत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही नियोजनबद्ध पाणीवाटपामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवश्यक पुरवठा सुरू आहे. धरणातून डाव्या कालव्याला ६२५ क्यूसेक तर उजव्या कालव्याला २२० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. गत वर्षी धरणात २४.१५ टक्के तर यावेळी ३४.३१ टक्के पाणीसाठा आहे. सध्या उन्हाळी आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी आणि पिकांच्या सिंचनासाठी सुरू करण्यात आले आहे.

या पाण्यावर परिसरातील शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी दत्ता कोकणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. पाणी व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन केल्यास आगामी काळात पाण्याची टंचाई टाळता येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.











