
मंचर : मंचर गावातील एका कॅफेमध्ये अवैध पार्टीशन करून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असभ्य व अश्लील वर्तन करण्यास मुभा दिल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी कॅफे चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मंचर पोलीस स्टेशन येथे गुरनं 161/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 296 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुनिल सिताराम काठे (ब. नं. 2746), नेमणूक मंचर पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 21 मे 2026 रोजी दुपारी 12.35 वाजण्याच्या सुमारास मंचर गावच्या हद्दीत आरोपी रविंद्र अशोक रणपिसे (वय 27, रा. वाफगाव, ता. खेड, जि. पुणे) याने चालवित असलेल्या “कॅफे आर 19” मध्ये अवैध पार्टीशन करून पडदे लावले होते. तसेच कॅफेच्या बैठक व्यवस्थेत बदल करून शाळा व कॉलेजमधील मुला-मुलींना असभ्य व अश्लील वर्तन करण्यास मुभा दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कवटे (ब. नं. 906) हे करीत आहेत. दाखल अंमलदार म्हणून सहायक फौजदार माडवे यांनी कामकाज पाहिले.












