
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करत जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी व चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांच्या दोन आरोपीना आंबेगाव तालुक्याच्या पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोंदेवाडी फाटा परिसरात तसेच कामशेत परिसरात एका आरोपीला अटक करून तसेच एका विधी संघर्षशीत बालकाला ताब्यात घेऊन एकूण २३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

गुन्ह्यात चोरी गेलेले सुमारे ३२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी आज शनिवारी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सन २०२५-२६ मधील दाखल जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचे आढावा घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पोलीस दप्तरी नोंद असलेल्या सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या दैनदिन हालचालीवर बारकाईने नजर ठेऊन गुन्ह्यात त्यांचा सहभागाबाबत तपास करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले होते.

गुन्हे घडलेल्या घटनास्थळी भेट देऊन आजू बाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून फिर्यादी, साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपींचे वर्णन व गुन्ह्याची कार्यपद्धती यावरून नारायणगाव व मंचर पोलीस ठाण्याच्या दप्तरी नोंद असलेले हर्षल तांदळे व महेश मंगळवेढेकर (रा. मंचर ता, आंबेगाव) यांचा काही गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती गोपनीय खबऱ्याकडुन मिळाल्यानंतर त्या अनुशंगाने पोलीस पथकाने हर्षल दत्तात्रय तांदळे (वय २५ वर्ष) व महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय २५ वर्ष) यांना (दि.१६) एप्रिल रोजी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोंदेवाडी फाटा परिसरातून ताब्यात घेतले त्यांनी पारगाव कारखाना हद्दीतील -१, घोडेगाव- २, नारायणगाव- १, जुन्नर -१, आळेफाटा -१ या सहा गुन्ह्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक पल्सर मोटार सायकल, दोन बंब असा एकूण २९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपी हर्षल तांदळे याचेवर सहा पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल असून त्याचेवर जानेवारी २०२६ मध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातून एक वर्ष कालावधीकरिता हद्दपार करणेची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. महेश मंगळवेढेकर याचे वर चाकण, वाकड पोलीस ठाण्यात यापूर्वी दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे संखेने दुसऱ्या एका कारवाईत पियुष बिरम नानावत (रा. सांगेशी- कामशेत ता. मावळ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो काही महिन्यापूर्वीच बाल सुधार गृहातून बाहेर आला असून त्याने त्याच्या दोन विधीसंघर्षित बालक साथीदार यांचे मदतीने जिल्ह्यातील उरुळी कांचन-२, दौंड-१, लोणावळा -१, वडगाव मावळ-२, राजगड-२, बारामती तालुका-१, भोर-२, जुन्नर-१, खेड-१, शिरूर-१, सासवड-१, वेल्हा – १, यवत -१ असे एकूण १७ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून तपासा दरम्यान एका विधी विधीसंघर्षित बालकास रखवालीत घेण्यात आले आहे. गुन्ह्यातील सुमारे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मोटार सायकल असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची उल्लेखनीय कामगिरी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, वडगाव मावळ चे पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील, उरुळी कांचन- सचिन वांगडे, खेड- सुभाष चव्हाण, पारगाव कारखाना – सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे महादेव शेलार, राहुल गावडे, दत्ताजी मोहिते, पोलीस उप निरीक्षक भाऊसाहेब लोकरे, अभिजित सावंत, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रमसिंह तापकीर, हेमंत विरोळे, अतुल डेरे, राजु मोमीन, निलेश सुपेकर, तुषार भोईटे, सागर नामदास, अजित भुजबळ, सचिन गाडगे, धीरज जाधव, असिफ शेख, योगेश नागरगोजे, राहुल पवार, समाधान नाईकनवरे, नंदा कदम, सुजाता कदम, सचिन गिलबिले, मंगेश अभंग, संजय साळवे यांनी केली.








