
पुणे-नाशिक बाह्यवळण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा मेंढरं आणि दोन कोकरं मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी घडली. भटक्या कुत्र्यांनी कळपावर हल्ला केल्याने घाबरलेली मेंढरं महामार्गावर आली आणि भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. या अपघातात वारूळवाडी येथील शेतकरी विवेक तुकाराम निंबाळकर यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

आनंदवाडी परिसरातील निंबाळकर यांचा ५० मेंढरांचा कळप शेतात चरत असताना अचानक भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांच्या भीतीने कळपातील काही मेंढ्या आणि कोकरं सैरावैरा पळत नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरील खोडद चौक उड्डाणपुलावर पोहोचली. उड्डाणपुलावरील पथदिवे बंद असल्याने चालकाला ही जनावरं दिसली नाहीत आणि अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

सरपंच विनायक भुजबळ, सुशांत भुजबळ आणि विपुल फुलसुंदर यांनी घटनास्थळी भेट देऊन सांत्वन केले. नारायणगाव व वारूळवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेषतः महामार्गालगतच्या कचरा डेपो परिसरात कुत्र्यांचा मोठा वावर असून, यामुळे नागरिक, मुले आणि शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. कोणतीही मोठी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.









