
घरगुती वादातून भीषण गुन्ह्या झाल्याची धक्कादायक घटना आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून आणि घरातील सततच्या कटकटीला कंटाळून एका नराधम बापाने स्वतःच्या दोन चिमुरड्या मुलांचा गळा आवळून त्यांना जंगलात फेकून दिले. या हृदयद्रावक घटनेत ३.५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, ५ वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. मोशी, जि. पुणे) याची पत्नी सहा महिन्यांपूर्वी त्याला आणि मुलांना सोडून गेली होती. तेव्हापासून घरात सातत्याने वाद आणि कटकटी होत होत्या. याच रागातून ५ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास सागरने आपली मुले आर्यन (वय ५ वर्षे) आणि हर्षदा (वय ३.५ वर्षे) यांना “फिरायला नेतो” असे सांगून घराबाहेर नेले. आरोपीने दोन्ही मुलांना आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्जन जंगलात नेले. रात्री ११:३० च्या सुमारास त्याने रागाच्या भरात दोघांचाही गळा आवळला. आर्यन मृत पावला आहे असे समजून त्याला तेथेच सोडून दिले, तर हर्षदाचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने झाडाझुडपात फेकून दिला.

दुसऱ्या दिवशी ६ मे रोजी सकाळी ७:३० वाजता सागर एकटाच घरी परतला. मुलांबाबत विचारले असता त्याने “ती चाकणला रूमवर आहेत” असे खोटे सांगितले. मात्र, त्याच वेळी आळेफाटा परिसरात आर्यन हा मुलगा बेवारस स्थितीत पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून त्याच्या आजोबांशी (सदाशिव शिंदे) संपर्क साधला. भोसरी एम.आय.डी.सी. आणि आळेफाटा पोलिसांनी संयुक्त तपास करत सागरला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपीने सांगितले की, घरातल्या सततच्या किरकिरीला कंटाळून त्याने दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांना जंगलात फेकले होते. त्याने दाखवलेल्या घटनास्थळी पोलिसांना हर्षदा या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ओंकार अशोक खुणे यांनी फिर्याद दिली असून, आळेफाटा पोलिसांनी आरोपी सागर शिंदे विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.









