
चांडोली बुद्रुक ता. आंबेगाव येथील वेताळमळा येथे दुःखद घटना घडली असून सुरेश पांडुरंग थोरात वय ४४ या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटना सोमवारी सकाळी साडेसात ते आठ वाजताचे दरम्यान घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुरेश पांडुरंग थोरात सकाळी साडेसात वाजता त्यांच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाणी भरत असताना जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाह पाण्यात उतरला व त्याचा जबरदस्त शॉक शेतकरी सुरेश थोरात यांना बसला यात त्यांचा मृत्यू झाला.

सदर महावितरण खांबाला काही दिवसापूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे पोल (खांब) वाकला होता हा खांब दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कडे केली होती मात्र कुठलीही उपाययोजना झाली नाही सुरेश पांडुरंग थोरात यांच्या मृत्यूला महावितरणचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वी आंबेगाव तालुक्यात विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याच्या तीन, चार घटना घडल्या असून महावितरणने ज्या ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत, तारा खाली आल्या आहेत त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान सुरेश पांडुरंग थोरात हे गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात होते. कमी वयात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती कळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.












