
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात असलेल्या खेतेपठार येथे दोन वर्षांच्या चिमुकल्या आदित्य विकास घनकुटे याचा रस्त्या अभावी वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रविवारी (ता.१५) रात्री आदित्यचा वाढदिवस कुटुंबीयांनी उत्साहात साजरा केला होता. सोमवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे खेळत होता. मात्र सकाळी १० वाजता जेवताना अचानक ठसका लागून तो बेशुद्ध पडला. काही वेळाने शुद्धीवर आला, पण प्रकृती चिंताजनक असल्याने कुटुंबीयांनी तातडीने दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला.

परंतु खेतेपठारच्या दुर्दैवी वास्तवाने त्यांच्या प्रयत्नांना अडथळा आणला. गावात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने आई सुनीता आणि आजी शारदा यांनी आदित्यला पाठीवर घेऊन सुमारे चार किलोमीटरचा डोंगर उतार पायी पार केला. आमोंडी येथे पोहोचल्यानंतर काका दत्तात्रय खमसे यांनी दुचाकीवरून त्याला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू असतानाच आदित्यचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खेतेपठारसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. “वेळेत रस्ता आणि उपचार मिळाले असते, तर माझा मुलगा वाचला असता,” अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया वडील विकास घनकुटे यांनी दिली.
आमोंडीचे उपसरपंच धनंजय फलके म्हणाले, खेतेपठार ते आमोंडी हा चार किलोमीटरचा रस्ता आहे. हा संपूर्ण रस्ता वन खात्याच्या हद्दीतून असल्यामुळे रस्ता होण्यासाठी अडचणी आहेत. या रस्त्यासाठीचा प्रस्ताव यापूर्वीच वन विभागाला दिला आहे. राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून हा रस्ता होण्यासाठी जोरदार पाठपुरावा करू. हा रस्ता झाल्यास येथील लोकांचा प्रश्न सुटेल. जुन्नर-आंबेगाव सीमेवरील खेतेपठार हा भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. वैष्णवधाम (ठाकरवाडी) येथील कच्चा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला असून वाहतुकीस पूर्णपणे अयोग्य झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण ठरत आहे.











