सिन्नरच्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; २४ मार्चचा दिला अल्टिमेटम

सिन्नर तालुक्यातील सायळे येथील एका शेतकऱ्याने चक्क गांजा आणि खसखस या पिकांच्या शेतीला अधिकृत दर्जा देण्याची मागणी केली असून, तसे न झाल्यास समृद्धी महामार्गावर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. या मागणीमुळे सिन्नर तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील सायाळे येथील विजय रामराव शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आता टोकाची भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. आगामी सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर गांजा आणि खसखस शेतीला कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी त्यांनी १ एप्रिल २०२५ पासून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. स्मरणपत्रे देऊनही शासनाने त्यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. ‘शासनाने अद्याप उत्तर दिले नाही, याचा अर्थ या विषयाला सरकारची रीतसर मूक संमती आहे, असे आम्ही समजतो,’ असा खोचक टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.

इतर पिकांप्रमाणेच गांजा, खसखस या पिकांना अधिकृत दर्जा देऊन त्यांचे बियाणे आधारभूत मूल्यानुसार उपलब्ध करून द्यावे. ‘माणसाला जन्म घ्यायला ९ महिने लागतात, प्राण्यांना १० ते ११ महिने; पण सरकारला १२ महिने होऊनही जाग आली नाही,’ अशा शब्दात शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारने २४ मार्च २०२६ पर्यंत निर्णय घेतला नाही तर समृद्धी महामार्गावर (चॅनल क्र. ५३० ते ५४५ दरम्यान) राज्यातील शेतकरी आमरण उपोषणाला बसतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. उपोषण काळात एखाद्या शेतकऱ्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याला सर्वस्वी शासकीय यंत्रणा जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनामुळे आता पोलीस प्रशासन आणि कृषी विभाग काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हे केवळ शासकीय पत्र न राहता सामाजिक चळवळ बनावी यासाठी विजय शिंदे यांनी या निवेदनाच्या प्रती केवळ राजकीय नेत्यांनाच नाही, तर सामाजिक भान जपणाऱ्या सयाजी शिंदे, नाना पाटेकर आणि बच्चू कडू, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार माणिकराव कोकाटे यांनाही दिल्या आहेत.










