
आंबेगाव तालुक्यात काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पंचायत समिती आंबेगावच्या माध्यमातून तीन गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. काही विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याबाबत पंचायत समितीचे सभापती कैलास काळे यांनी माहिती दिली.

कारेगाव, थुगाव आणि पारगावतर्फे खेड या गावांसह परिसरातील वाड्या, वस्त्यांवरील सुमारे ६ हजार ८२५ नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खासगी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. कारेगाव येथील कानिफनाथवस्ती, बेंदवस्ती, माळवस्ती आणि गावठाण परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे थुगाव येथील सवाईमळा, नागुमळा, माळीमळा, कोल्हारवाडी, गणेशनगर, ठाकरवाडी आणि गावठाण भागालाही टँकरने पाणी दिले जात आहे. पारगावतर्फे खेड परिसरातील मनकरवस्ती, चिखलेवस्ती, गंगेवाडी, पवार-घुलेवस्ती, चव्हाणवस्ती, माळीमळा, सावंतवस्ती, भागडेवस्ती, पवळेवस्ती, पठारेवस्ती, बागलवस्ती, ढगे ठाकरवाडी तसेच इतर वाड्यांवरही टँकर पुरविण्यात येत आहे. दरम्यान, भावडी, कुरवंडी, पेठ, निघोटवाडी, दस्तुरवाडी, माळीण, पहाडदरा आणि वडगावपीर या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त झाले आहेत.

या गावांमध्येही लवकरच टँकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे त्या गावांनी पंचायत समिती आंबेगाव, घोडेगाव येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, उपसभापती ज्योती पारधी यांनी केले आहे.











