
आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात घराच्या जागेच्या वादातून एका महिलेस कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदा तानाजी सोनवणे (वय 60 वर्ष, व्यवसाय विटभट्टी, रा. धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुरेश धोंडीबा सोनवणे (रा. धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे, सध्या रा. केडगाव चौफुला, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास व रात्री 8 वाजता धामणी गावाच्या हद्दीत घडली. फिर्यादी नंदा सोनवणे या घरी असताना त्यांचा दिर सुरेश सोनवणे हा दारूच्या नशेत घरी आला व त्याने शिवीगाळ करत “तुमचा एकेका जणाचा मर्डर करतो” अशी धमकी दिली. त्यानंतर तो तेथून निघून गेला.

दरम्यान, गावातील जिल्हा परिषद शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असल्याने नंदा सोनवणे या त्यांचा मुलगा संपत, सून पूजा व शितल यांच्यासोबत कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास त्या कार्यक्रमाच्या ठिकाणावरून परत जात असताना शिवशंकर दूध डेअरीसमोर अचानक सुरेश सोनवणे हा हातात कोयता घेऊन त्यांच्या अंगावर धावून आला. यावेळी “तुला जिवंत सोडत नाही, तुझा मर्डरच करतो” असे म्हणत त्याने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी नंदा सोनवणे यांनी दोन्ही हात पुढे केले असता आरोपीने त्यांच्या दोन्ही हातांवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. त्यानंतर त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पाठीमागून कोयत्याने पाठीच्या उजव्या बाजूस वार करून त्यांना आणखी गंभीर जखमी केले. त्यावेळी त्यांचा मुलगा संपत, सून पूजा व शितल घटनास्थळी आले. त्यांना पाहून आरोपीने “तुमचा एकेकाचा मर्डर करतो” अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि कोयता घेऊन तेथून पळ काढला.

जखमी नंदा सोनवणे यांना त्यांच्या मुलगा संपत सोनवणे, सून पूजा सोनवणे, मुलगी ललिता दरेकर व कावेरी कुंभार यांनी खासगी वाहनाने पारगाव येथील ओम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. पुढे त्यांना सिद्धी हॉस्पिटल, मंचर येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 24/2026 भा.न्या.सं. कलम 109, 118(2), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोसई लोकरे हे करीत आहेत.












