
जुन्नर तालुक्यात बुधवारी घडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवरील हल्ल्याच्या घटनेत मोठी घडामोड घडली असून, हल्ला करणाऱ्या आरोपीने जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जुन्नर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या काही अंतरावर बुधवारी महेश डामसे (वय २४) या युवकाने एका २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर निघृणपणे हल्ला केला होता. या हल्ल्यात संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या जुन्नर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी महेश डामसे हा फरार झाला होता.

या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी जुन्नर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी समांतर तपास सुरू केला होता. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात होती. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास गणेशखिंडीच्या परिसरात महेश डामसे याची दुचाकी आढळून आली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरात कसून शोध सुरू केला. सुमारे दहा किलोमीटर जंगल परिसरात पायपीट करून शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर जंगलातील एका झाडाला महेश डामसे याने गळफास घेतल्याच्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर तसेच जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले व त्यांच्या पथकाने शोधमोहीम राबवत आरोपीचा मृतदेह शोधून काढला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या घटनेचा अधिक तपास जुन्नर पोलीस करत आहेत.












