
पारगाव (ता. आंबेगाव) : शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पारगाव (कारखाना) पोलिसांनी अटक करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण ५ विद्युत मोटारी जप्त केल्या असून ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त मालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ४३ हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींमधून व पाण्याच्या ठिकाणांवरून मोटार चोरीचे प्रकार वाढल्याने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे, मंगेश अभंग यांना गोपनीय माहिती मिळाली की, जारकरवाडी (ता. आंबेगाव) परिसरात काही इसम पांढऱ्या रंगाच्या कारमधून चोरीच्या विद्युत मोटारी घेऊन जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. वाहनातील इसमांची चौकशी केली असता त्यापैकी एकाचे नाव प्रसाद दत्तात्रय डुकरे (वय २३, रा. औरंगपूर, ता. जुन्नर, जि. पुणे) असे असल्याचे समोर आले. त्याच्यासोबत एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये शेतातील पाण्यात वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटारी आढळून आल्या. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटार चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले. या कारवाईत पारगाव, शिरूर आणि नारायणगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश कालेकर, दत्तात्रय जाधव, तसेच पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, गजानन डाके यांनी सहभाग घेतला.











