
महाराष्ट्र शासनामार्फत दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी नवीन दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मात्र या पोर्टलवर दिव्यांग नागरिकांचा १७ अंकी UDID क्रमांक अपलोड होत नसल्याची गंभीर तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यासह राज्यातील अनेक दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

दिव्यांग नागरिकांना एसटी महामंडळाची ७५ टक्के तिकीट सवलत, तसेच संजय गांधी निराधार योजना, विविध आर्थिक सहाय्य योजना व इतर शासकीय लाभ घेण्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी व पडताळणी करणे आवश्यक असते. मात्र पोर्टलवर १७ अंकी UDID क्रमांक स्वीकारला जात नसल्यामुळे अनेकांचे अर्ज अपूर्ण राहतात किंवा पडताळणी प्रक्रियेत प्रकरणे प्रलंबित राहतात. या गंभीर समस्येमुळे दिव्यांग नागरिकांना वारंवार कार्यालयांचे फेरे मारावे लागत असून त्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक पात्र लाभार्थी केवळ तांत्रिक त्रुटीमुळे शासनाच्या महत्त्वाच्या योजनांपासून वंचित राहत आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष मा. जितेंद्र लक्ष्मण भालेराव यांनी या समस्येची दखल घेत आंबेगाव तहसीलदार यांना निवेदन देत दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरील ही तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर सकारात्मक व तातडीने कार्यवाही करून दिव्यांग नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. शासनाने दिव्यांग नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असल्या तरी तांत्रिक अडचणींमुळे त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडथळे येत असतील, तर त्या तातडीने दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येची तात्काळ दखल घेऊन दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरील १७ अंकी UDID क्रमांक अपलोड होण्याची सुविधा लवकरात लवकर सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.











