
चांडोली खुर्द ता. आंबेगाव येथे सौर कृषी वाहिनी प्रकल्प ला विरोध करण्यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी चांडोली ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. या उपोषणाला आंबेगाव तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला होता. यावेळी प्रशासनाने याबाबत तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला होता. त्यावेळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली त्यावर सकारात्मक चर्चा करत आंदोलन पाठीमागे घेण्यात आले होते मात्र आता सदर ठिकाणी पोलिस बंदोबस्तात सौर कृषी प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चांडोली खुर्द गणेश मंदिराजवळ समस्त ग्रामस्थ चांडोली यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, शिवसेना तालुका प्रमूख प्रवीण थोरात, सचिन बांगर, रवी वळसे पाटील, बी टी बांगर, मनोहर इंदोरे, प्रकाश इंदोरे, भाजपचे ताराचंद कराळे, प्रमोद बाणखेले, सागर काजळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे, पंचायत समिती सदस्य शिवाजी निघोट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात, यासह विविध नेत्यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

चांडोली खुर्द गावात सौर कृषी योजना राबवण्यासाठी दोन हेक्टर जागा दिली असतानाही प्रशासनाने परस्पर १२ हेक्टर जागेचा ताबा घेत त्यावर काम सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात गावच्या विकास कामासाठी जागा अपुरी पडणार असून विविध शासकीय योजना, विकास कामे राबवण्यासाठी गावाला जागेची गरज आहे त्यामुळे प्रशासनाने फक्त दोन हेक्टर जागेचा वापर करावा उर्वरित जागा गावासाठी ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. या मागणीचा प्रशासनाने विचार करत सकारात्मक चर्चा करून आंदोलन मागे घेतले होते. मात्र आज दिनांक १२ रोजी सदर प्रकल्प राबवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात काम सुरू झाल्याने गावाला पोलीस छावणीचे रूप आले आहेत. प्रशासन एक प्रकारे ग्रामस्थांवर अन्याय करत असल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखवली असून भविष्यात या प्रकल्पाचे प्रश्नावरून ग्रामस्थ व प्रशासन समोरासमोर येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान आंदोलन प्रसंगी आंदोलनाला विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. मात्र आता प्रत्यक्षात काम सुरू झाल्याने आंदोलन वेळ भाषणबाजी, स्टंटबाजी करणारे पुढारी कुठे गेले असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे.
तसेच राज्याचे माजी मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आंदोलन प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना सदर ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून त्यानुसार काम करावे. ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करावा असे सांगितले होते. त्याबाबत सकारात्मक चर्चा देखील झाली होती. मात्र आता दडपशाही पद्धतीने काम सुरू केले असल्याचे सरपंच अमोल दाभाडे यांनी सांगितले.











