
आंबेगाव तालुक्यातील शिनोली परिसरात विनापरवाना जळाऊ लाकडाची साठवणूक केल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे.
दि. ९ मार्च २०२६ रोजी घोडेगाव वनपरिशेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, शिनोली यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत मौजे शिनोली (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे शिनोली–उगलेवाडी रस्त्यालगत असलेल्या अक्षय दत्तात्रय सोमवंशी (रा. शिनोली) यांच्या वीटभट्टीवर पाहणी केली. या पाहणीदरम्यान वीटभट्टी परिसरात विविध वृक्ष प्रजातींचे सुमारे १५ घनमीटर जळाऊ सरपण विनापरवाना वाहतूक करून साठवून ठेवलेले आढळून आले.

या सरपणामध्ये रायवळ जातींचे निलगिरी, कडुलिंब, बोर, करंज, अकेशिया, चिंच, पिंपळ व उंबर या प्रजातींचा समावेश असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. सदर प्रकरणी वीटभट्टी मालक अक्षय सोमवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे जळाऊ सरपण स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्याचे सांगितले. मात्र त्याबाबत आवश्यक परवाना किंवा कागदपत्रे सादर करता आली नाहीत. या अनुषंगाने वनविभागाने भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२)(बी) व कलम ४२ तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे कलम ३१ व कलम ८२ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

वनविभागाने जप्त केलेल्या सरपणाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.












