
आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड प्रक्रिया आज घोडेगाव ता. आंबेगाव येथे राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती पदी कैलास बुवा काळे तर उपसभापती पदी ज्योती पारधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सर्व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विद्यमान सभापती उपसभापती यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत सूचना केल्या. पुढील काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढणार असून आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवु लागली आहे. त्यानुसार सर्वांनी आराखडा तयार करावा ज्या ठिकाणी टँकरची गरज आहे त्या ठिकाणी टँकर पुरवावा प्रत्येक पंचायत समिती सदस्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील विविध समस्या अडचणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे. गावागावात कॅम्प घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा पंचायत समितीच्या कारभाराचा आढावा दर दोन-तीन महिन्यातून मी घेणार आहे असेही वळसे पाटील म्हणाले.












