
जुन्नर वनविभागातील वाढता मानव-बिबट संघर्ष आणि माणिकडोह निवारण केंद्रातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जुन्नरमधील माणिकडोह केंद्रातून २० बिबट्यांचा पहिला टप्पा आज, ७ मार्च २०२६ रोजी गुजरातच्या जामनगर येथील ‘ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’ (वनतारा) येथे यशस्वीरित्या रवाना करण्यात आला.

गेल्या १० वर्षांत जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या संघर्ष क्षेत्रातून पकडलेल्या बिबट्यांना जुन्नरमधील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ठेवले जाते. मात्र, या केंद्राची क्षमता केवळ ५० बिबट्यांची आहे. ही क्षमता ओलांडली गेल्याने, येथील बिबट्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे होते. त्यानुसार, ५० बिबट्यांच्या स्थलांतराचा प्रस्ताव ‘केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे’ (CZA) पाठवण्यात आला होता, ज्याला २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी मिळाली.

▪️हायटेक ‘रेस्क्यू व्हॅन’द्वारे प्रवास
या स्थलांतर प्रक्रियेसाठी ६ मार्च २०२६ रोजी जामनगरहून २५ सदस्यीय तज्ज्ञांचे पथक, पशुवैद्यकीय अधिकारी श्री. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली जुन्नरमध्ये दाखल झाले होते. आज पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांचे (१० नर आणि १० मादी) स्थलांतर करण्यात आले. विशेष म्हणजे, या बिबट्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी त्यांना ‘वनतारा’च्या वातानुकूलित आणि सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशा रेस्क्यू व्हॅनमधून नेण्यात आले आहे. प्रवासादरम्यान बिबट्यांच्या आरोग्याची आणि तांत्रिक बाबींची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
▪️वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहीम फत्ते
ही संपूर्ण प्रक्रिया अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. जितेंद्र रामगावकर आणि पुणे वनसंरक्षक श्री. आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, लोजेश पाटील, स्मिता राजहंस, अमृत शिंदे, प्रदीप चव्हाण, चैतन्य कांबळे तसेच ‘वाईल्डलाईफ एस.ओ.एस.’ संस्थेचे कर्मचारी आणि इतर वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. वनविभागाचे आवाहन मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. नागरिकांनीदेखील वनविभागाला सहकार्य करावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी यावेळी केले आहे.












