
सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील शरद सहकारी बँकेने अपघातात मृत्यू पावलेल्या आपल्या कर्जदार खातेदाराच्या वारसाला सहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

जवळे येथील रहिवासी तथा बँकेचे कर्जदार खातेदार दिलीप जयराम येलभोर यांचा दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. दिलीप येलभोर यांनी शरद सहकारी बँकेतून तीन लाख रुपयांचे पगार तारण कर्ज घेतले होते. बँकेमार्फत कर्जदारांसाठी वैयक्तिक अपघात विमा संरक्षण योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत दिलीप येलभोर यांच्या नावावर पाच लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा होता. तसेच ते बँकेचे सभासद असल्याने त्यांना एक लाख रुपयांचे अतिरिक्त विमा संरक्षण लागू होते. या दोन्ही योजनांमधून एकूण सहा लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या वारसाच्या स्वाधीन करण्यात आला.

या धनादेश वितरण प्रसंगी बँकेचे प्रमुख मार्गदर्शक व राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, संचालक शिवाजीराव लोंढे, दत्ताशेठ थोरात, निवृत्ती अभंग, अजय घुले, के.के.सैद, दौलतभाई लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व सेवकवृंद उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शरद सहकारी बँक ही केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून सभासद व कर्जदारांच्या अडचणीच्या काळातही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, असे सांगितले. अशा प्रकारच्या विमा योजनांमुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो. आणि सहकार क्षेत्रावरील विश्वास अधिक दृढ होतो, असे मत व्यक्त करण्यात आले. या घटनेमुळे शरद सहकारी बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्वाची पुन्हा एकदा प्रचिती आली असून सर्व स्तरांतून बँकेच्या कार्याचे कौतुक होत आहे.










