
मंचर बस स्थानक परिसरात मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या बॅगा व दागिन्यांची चोरी करणारी टोळी अखेर मंचर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या प्रकरणात दोन महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंचर बस स्थानकावर प्रवाशांचे पैसे व महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी विशेष पथक तयार केले होते. दरम्यान, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील दोन महिला आणि एक पुरुष नारायणगावकडून पुण्याकडे चारचाकी वाहनाने येत आहेत. या माहितीच्या आधारे मंचर पोलिसांनी नारायणगाव – भोऱवाडी फाटा परिसरात सापळा रचला. संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये दोन महिला व एक पुरुष आढळून आले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे
बेबीनंदा इंद्रजीत कसबे (वय ५०, रा. विलासनगर, जि. लातूर), स्वाती उमाकांत तपसाळे (वय ३६, रा. आष्टा जहागीर, ता. उमरगा, जि. धाराशिव), शिवाजी सुभाष घोलप (वय ३६, रा. जागनी, ता. धाराशिव) अशी सांगितली. सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी १०/९/ २०२५ व १५/२/२०२६ रोजी मंचर बस स्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दोन गंठण गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी २४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण सुमारे ₹२,४४,९८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस हवालदार संजय नाडेकर, शेखर भोंडवे, सुमीत मोरे तसेच पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे बस स्थानक परिसरात प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.









