
आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शुक्रवारी दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात किशोर बाबाजी हुले वय ३२ राहणार लांडेवाडी पिंगळवाडी तालुका आंबेगाव या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचे समवेत असलेले दोन वर्षांचे बालक जखमी झाले आहे. या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशन येथे सुरज बाळासाहेब हुले यांनी फिर्याद दाखल केली असून अपघातास कारणीभूत ठरलेला पीक अप चालक अनिकेत दिनकर साबळे वय,२८ राहणार लांडेवाडी तालुका आंबेगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास मंचर ते भिमाशंकर मार्गावरील लांडेवाडी हद्दीत इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ हा अपघात घडला. आरोपी अनिकेत दिनकर साबळे हा आपल्या ताब्यातील पिकअप गाडी (क्रमांक एम एच १६ ए ई २९९१) मंचरकडून घोडेगावकडे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता.

त्यावेळी घोडेगावकडून मंचरकडे येणाऱ्या पल्सर दुचाकीला (एम एच १४ जे क्यू ५४७९) त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील किशोर बाबाजी हुले (वय ३२, रा. लांडेवाडी पिंगळवाडी ता. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या दोन वर्षीय मुलगा अगस्त्य किशोर हुले याला किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या प्रकरणी फिर्यादीनुसार मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार डावखर करीत आहेत. या घटनेमुळे लांडेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.











