
पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने आंबेगाव तालुक्यातील सराईत गुन्हेगारावर मोठी कारवाई करत त्याला महाराष्ट्र प्रतिबंधक (एमपीडीए) कायद्या अंतर्गत स्थानबद्ध केले आहे. मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील पवन सुधीर थोरात (वय २६, रा. जुना चांडोली रोड, मंचर ता. आंबेगाव, जि. पुणे) याच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या पवन थोरात याच्या हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले होते. पवन सुधीर थोरात याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मारहाण, दहशत निर्माण करणे, महिलांशी गैरवर्तन अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी संबंधित प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठांकडे सादर केला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी प्रस्ताव मान्य करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र दुडी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी उपलब्ध कागदपत्रे व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पवन थोरात याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याला ताब्यात घेऊन अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व मंचर पोलीस स्टेशनच्या पथकाने पार पाडली.सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पुणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.










