
आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील डोबीमळा येथे मध्यवर्ती वस्तीत एका बंद फ्लॅट ला आग लागून घरातील संसारोपयोगी वस्तू, फर्निचर, रोख रक्कम व सोन्याचे दागिने अशा अंदाजे साडेतीन लाख रुपयांच्या ऐवज जाळून खाक झाला असल्याची घटना शुक्रवार दि.१३ रोजी घडली आहे.

मूळ चांडोली येथील रहिवासी असलेले शिक्षिका मोनिका थोरात व त्यांचे पती अरुण थोरात हे मंचर येथे गेल्या अनेक दिवसापासून वास्तव्यवसाय आहेत ते दिनांक १३ रोजी कामानिमित्त पुण्याला गेले असताना त्यांच्या फ्लॅटमधून अचानक धूर निघला. काचा फुटून रस्त्यावर पडत असल्याचे पाहून आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. मात्र, फ्लॅट बंद असल्याने सुरुवातीला आत प्रवेश करणे शक्य झाले नाही. हा प्रकार मोनिका थोरात यांना कळविल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली.

रहिवाशांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आगीने रौद्र रूप धारण केले होते. नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. दिवाळीच्या सुमारास सदनिकेचा ताबा घेऊन वास्तुशांती व सत्यनारायणाची पूजा केली होती. घरासाठी शरद बँकेकडून कर्जही घेतले होते. पोलिसांनीही पंचनामा केला असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. सचिन वाघ, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र कदम, महसूल सेवक संदीप पडवळ यांनी घटनास्थळी भेट दिली.












