
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे यंदा महाशिवरात्रीच्या कालावधीतही मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत मंदिरात नित्यदर्शनासाठी प्रवेश बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

नऊ जानेवारीपासून पुढील तीन महिने श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर विकासकामांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या काळात महाशिवरात्रीला मंदिर उघडे राहील, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दगड आणि इतर बांधकाम साहित्य पडलेले असल्याने भाविकांना त्या माध्यमातून धोका होऊ नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकर येथे येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आराखडा मंजूर केला आहे. गर्दी व्यवस्थापन, सुरक्षित प्रवेश निर्गमन, पायरीमार्ग तसेच भाविकांसाठी सुसज्ज सुविधा उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. जुन्या सभामंडपाचे क्षेत्र अपुने पडत असल्याने नवीन भव्य सभामंडप उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या मुख्य सभामंडप उतरविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य, दगड व यंत्रसामग्री असल्याने भाविकांसाठी दर्शन सुरू ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. पावसाळ्यात कामे करणे कठीण असल्याने उपलब्ध कालावधीतच्च विकासकामे पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे भाविकांनी प्रशासनाच्या निर्णयाला सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष सुरेश कौदरे केले आहे.












