
आंबेगाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गणांसाठी शनिवारी (दि. ७) ६५.१० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

शनिवारी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळ पासूनच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. विशेषतः सकाळी साडेसात ते ११ या वेळेत मतदारांची लक्षणीय गर्दी झाली होती. दुपारच्या सुमारास काही प्रमाणात मतदारांची उपस्थिती कमी झाली असली तरी मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होती.

सायंकाळी मतदारांनी पुन्हा मतदान केंद्रांवर गर्दी केली. अनेक ठिकाणी रांगा लागल्या. सायंकाळच्या सत्रात मतदानाचा वेग वाढला होता. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळावीत यासाठी उमेदवार तसेच त्यांच्या समर्थकांकडून प्रयत्न सुरू होते. सर्व मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून आवश्यक सोयी-सुविधा व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मतदान केंद्रावर विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेष्ठ नागरिक, दिव्यांग यांना मतदानासाठी गाडीची व्यवस्था केली होती मतदानाची टक्केवारी वाढावी आपला उमेदवार निवडून यावा यासाठी कार्यकर्ते धावपळ करताना चित्र पाहावयास मिळाले.











