
कळंब–महाळुंगे रस्त्यावर स्मशानभूमीजवळ शनिवारी दुपारी ३ वाजता ट्रॅक्टर ट्रॉलीची महावितरणच्या वीज वितरण डीपीला जोरदार धडक बसल्याची घटना घडली. सुदैवाने त्या वेळी परिसरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, बारकू जाधव (रा. नांदूर, ता. आंबेगाव) हे दोन मोकळ्या ट्रॉलींसह ट्रॅक्टर घेऊन जात होते. यावेळी अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रॅक्टर पुढे निघून गेल्यानंतर मागील ट्रॉलीने रस्त्यालगत उभ्या असलेल्या महावितरणच्या खांबांना आणि डीपीला जोरदार धडक दिली. या धडकेत वीज खांब वाकले असून डीपीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाहणी करून पुढील दुरुस्तीची कामे हाती घेतली. अपघाताच्या वेळी त्या ठिकाणी नागरिक किंवा वाहने नसल्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे काही काळ परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता.












