
मंचर (ता. आंबेगाव) येथील मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांवर एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. इसम नामे गोदया ऊर्फ हर्षद दत्तात्रय तांदळे (वय २५) रा. मंचर व विकास झुंबर जारकड (वय ३६) रा. अवसरी बु., जारकडमळा, ता. आंबेगाव, अशी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सदर दोन्ही इसम हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, चोरी आदी स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमुळे परिसरातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्यावर यापूर्वी वेळोवेळी कायदेशीर कारवाई करण्यात आली असली तरी त्यांच्यात कोणतीही सुधारणा दिसून येत नव्हती. सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. हा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी (जुन्नर–आंबेगाव उपविभाग) यांच्याकडे पाठविण्यात आला.

प्रस्तावावर सुनावणी घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी आदेश पारित करत दि. २८ जानेवारी २०२६ ते दि. २७ जानेवारी २०२७ या कालावधीसाठी दोन्ही आरोपींना पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. आदेशाची बजावणी करून आरोपींना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग अतुल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, सहा. पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सनील धवने, यशवंत यादव तसेच पोलीस कर्मचारी संजय नाडेकर, तानाजी हगवणे, योगेश रोडे, अजित पवार, हनुमंत ढोबळे, सुनील काठे व अविनाश दळवी यांनी सहभाग घेतला.












