
जिल्हा परिषद निवडणुकीच्या ऐन तोंडावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष पूजाताई वळसे पाटील यांनी आज शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून पारगाव–जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

हा प्रवेश सोहळा आमदार शरद सोनवणे, शिवसेना नेते रमेश भाऊ येवले तसेच निरगुडसर गावचे सरपंच रवींद्र वळसे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना झालेल्या या पक्षांतराकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे पूजाताई वळसे पाटील या पारगाव–जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होत्या. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने निवडणूक रणांगणातील चित्र एकदम बदलले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे या गटात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे बोलले जात आहे.

या घडामोडींचा थेट फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विवेक वळसे पाटील यांना बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. पूजाताई वळसे पाटील यांचा तालुक्यातील महिलांमध्ये तसेच स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चांगला प्रभाव असून त्यांची संघटनात्मक पकड लक्षात घेता शिवसेनेला याचा निश्चितच फायदा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रवेशानंतर बोलताना शिवसेना नेत्यांनी हा प्रवेश पक्षासाठी बळकटी देणारा असल्याचे सांगितले. “स्थानिक विकास, महिलांना संधी आणि शिवसेनेची भूमिका यावर विश्वास ठेवून पूजाताईंनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यशैलीचा पक्षाला निश्चित लाभ होईल,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून या प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या घडामोडीमुळे तालुक्याच्या राजकारणात पुढील काही दिवस मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.











