
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ वा राष्ट्रीय मतदार दिवस २०२६ पुणे जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हास्तरीय कार्यक्रम रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, पुणे येथे सकाळी १०.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे.

या कार्यक्रमात आंबेगाव तालुक्याचे नायब तहसीलदार सचिन वाघ यांचा उत्कृष्ट निवडणूक नायब तहसीलदार म्हणून विशेष सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय, पारदर्शक व लोकाभिमुख कार्याची दखल थेट निवडणूक आयोगाने घेतल्याने हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.सचिन वाघ यांनी आंबेगाव तालुक्यात मतदार नोंदणी वाढ, नवमतदारांना मतदान प्रक्रियेबाबत जागरूक करणे, मतदार याद्यांचे अचूक व वेळेत अद्ययावतीकरण, तसेच निवडणूक काळात शांततापूर्ण व पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे तालुक्यात मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने निवडणूक यंत्रणेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करून त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, निवडणूक यंत्रणेतील कर्मचारी तसेच मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार जागृती, मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या कार्यक्रमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.












