
मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पेठ येथील खत औषधाच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना मंचर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून सुमारे ८,११,२०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पेठ तालुका आंबेगाव येथिल किरण कैलास कुंदळे यांच्या सह्याद्री कृषी उद्योग या खत औषधाच्या दुकानात दिनांक १/१/२०२६ रोजी रात्रीच्या सुमारास शटर उचकटून चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ३ लाख ११ हजार २०५ रुपयांच्या खत औषधे बी बियाणे चोरून नेले होते. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अज्ञात चोरटे त्यांच्याजवळ असलेली इर्टिगा कार क्रमांक MH-15-DM-8127 मधून चोरीचा माल मंचर ते सुलतानपूर रोडवर नवीन पुणे नाशिक हायवे रोडचे पुलाखाली कोणालातरी विक्रीसाठी घेऊन थांबले असल्याची माहिती समजली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता त्यांनी त्यांची नावे संतोष पोपट नलावडे (वय ३४, रा. नानेकरवाडी चाकण तालुका खेड) व अमर संतोष नायक (वय १९, रा. खराबवाडी तालुका खेड) अशी सांगितली. पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेली ५ लाख रुपये किमतीची ईरटीका कार व चोरलेले ३ लाख ११ हजार २०५ रुपयांचे खते औषधे बी बियाणे असा एकूण ८ लाख ११ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, सहा. पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, पोलीस हवालदार शेखर भोंइर, संजय नाडेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे, अजित पवार, हनुमंत ढोबळे व सुनील काठे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नंदकुमार आढारी करत आहे.












