
जारकरवाडी ता. आंबेगाव येथील कापडदरा येथे वैद्य व कापडी या बांधवांच्या बांधावरून असलेल्या वादातून गेली २० ते २५ वर्ष बंद असलेला रस्ता दिनांक ८ रोजी तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून हा रस्ता खुला झाल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे तसेच वैद्य व कापडी कुटुंबियांचे आभार मानले आहेत.

जारकरवाडी येथील कापडदरा येथे दोनशे ते अडीचशे लोकवस्ती असून त्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी व वाहतुकीसाठी असलेला रस्ता गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून वादामुळे बंद होता याबाबत वैद व कापडी कुटुंबीयांनी तसेच नागरिकांनी मागील वर्षी तहसीलदार यांच्याकडे हा रस्ता खुला होणे बाबत तक्रारी अर्ज केला होता. याबाबत वारंवार सुनावणी घेऊन वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून शासनाच्या नियमानुसार तहसीलदार यांनी हा रस्ता खुले करण्याबाबत आदेश दिले. त्यानंतर दिनांक ८ रोजी मंडळ अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, महसुलअधिकारी, पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा रस्ता सामंजस्याने खुला करण्यात आला हा रस्ता खुला झाल्यामुळे कापडदरा येथील दोनशे ते अडीचशे लोकवस्ती असलेल्या नागरिकांना रस्त्याने येजा करता येणार असून लहान मुले जेष्ठ नागरिक यांना हा रस्ता वापरण्यासाठी खुला झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.












