
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली संलग्न कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या वतीने कृषी क्षेत्रातील घडामोडी प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना गौरविण्यात आले. यामध्ये Zee २४ तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांना कृषी क्षेत्रातील प्रसार माध्यम क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील विविध समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, नवनवीन तंत्रज्ञान, शासनाच्या योजना आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा प्रभावीपणे मांडत शेतकरी व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून हेमंत चापुडे यांनी केलेल्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यास कृषी विभागातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्राचे पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कृषी क्षेत्राच्या विकासात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत हेमंत चापुडे यांच्या कार्याचे कौतुक केले. पुरस्कार स्वीकारताना हेमंत चापुडे यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील सकारात्मक बदल समाजासमोर मांडण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याची भावना व्यक्त केली. हा सन्मान संपूर्ण माध्यम क्षेत्रासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध घटकांना प्रेरणा मिळत असून भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून कृषी विकासाला चालना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.












