
घाटकोपर (पश्चिम) येथील बर्वे नगर कॉलनी ‘ए’ परिसरात मंगळवार, दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत ओम शिव साई गणेश मंदिराजवळील समाज कल्याण हॉलमध्ये ह. भ. प. श्री ऋषिकेश विकास वायाळ यांचे भव्य व अभ्यासपूर्ण कीर्तन संपन्न झाले. या कीर्तनाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

सदर कीर्तनामध्ये नामअनुग्रह, प्रबोध, अष्टसात्त्विक भाव, सद्गुरु महिमा, मोक्षप्राप्ती आदी विषयांवर सखोल विवेचन करण्यात आले. चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे यांना अनुसरून व प्रमाण मानून विविध दृष्टांत व सिद्धांत प्रभावीपणे मांडण्यात आले. कीर्तनात ज्ञानेश्वरी, श्रीमद्भागवत, भगवद्गीता, अमृतानुभव, कठोपनिषद, तुकाराम गाथा, हरिपाठ, काकडा तसेच इतर ग्रंथांचा संदर्भ घेत दशग्रंथी अभ्यासपूर्ण निरूपण करण्यात आले.

या आध्यात्मिक सोहळ्यामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनाच्या समारोपप्रसंगी कीर्तनकार ह. भ. प. गणेश पोपट चकवे यांनी ह. भ. प. श्री ऋषिकेश विकास वायाळ यांचा हार घालून सत्कार केला. दर महिन्याच्या चतुर्थीला राष्ट्रसंत श्रीपाद बाबा व रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने या कीर्तनमालिकेचे आयोजन करण्यात येते. तसेच आनंद भूषण भागवताचार्य श्री पोपट महाराज चकवे व ज्ञानेश्वरी निरूपणकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. श्री संपत महाराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कीर्तने नियमितपणे आयोजित केली जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.या कीर्तनामुळे परिसरात भक्तीमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












