
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ; आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

या प्रवेशामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते माजी आमदार बी.डी. अण्णा काळे यांचे नातू कपिल काळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने. त्यांच्या प्रवेशामुळे घोडेगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. घोडेगाव परिसरातील विविध गावांतील कार्यकर्ते, पदाधिकारी व युवकांनी शिवसेना शिंदे गटाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत शिवसेना ही सर्वसामान्य जनतेचा पक्ष असून विकासाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.
जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर यांनी आंबेगाव तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात तालुक्यातील विकास कामांना अधिक गती मिळेल, तसेच सर्व कार्यकर्त्यांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रवेशामुळे घोडेगाव व आंबेगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून शिवसेना शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे.

यावेळी कपिल काळे यांच्या समवेत सूर्यकांत काळे, गणेश काळे, विजय काळे, मुरलीधर काळे, अनिल काळे, सुशील काळे, सूर्यकांत काळे, गणेश काळे, संतोष भास्कर, नरेंद्र काळे, उमेश काळे, आनंद काळे, मनोज काळे, गणेश घोलप, अक्षय राऊत, संदीप काळे, अमित काळे यासह अनेकांनी प्रवेश केला आहे.












