
लाखनगाव (ता. आंबेगाव) येथे ऊसतोड सुरू असताना उसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याची घटना शुक्रवार, दि. २६ रोजी घडली.
लाखनगाव–रोडेवाडी फाटा रस्त्याजवळ लक्ष्मण बाणखेले यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू असताना ऊस तोड कामगारांना बछडे दिसून आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ वन विभागाच्या वनरक्षक पूजा कांबळे यांना कळविले. मंचर वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक खबरदारी घेतली. मादी बिबट्या पुन्हा येऊन बछड्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जावी .यासाठी तेथे ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला आहे. सध्या बछडे सुरक्षित असून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रोडेवाडी फाटा परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक गर्दी करू नये व रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.












