
‘पैसे वाटा आणि निवडून या’ ही नवी घातक प्रथा
मंचर नगरपंचायत ची निवडणूक नुकतीच संपन्न झाली मात्र निवडणुकीनंतर जे चित्र समोर आले आहे, ते केवळ धक्कादायक नाही तर भविष्यातील राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे. या निवडणुकीने एक अत्यंत घातक पायंडा पाडला आहे, तो म्हणजे—’अमाप पैसे वाटा आणि सत्ता मिळवा’. मात्र, मतदारांनी या प्रथेला जोरदार चपराक दिली असली, तरी पराभूत उमेदवारांचा संताप आता सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठला असून एक प्रकारे खूनशीचे राजकारण पहावयास मिळत आहे.
मंचरच्या राजकारणात यावेळेस पैशांचा जो वारेमाप वापर झाला, त्यावरून असे दिसते की उमेदवारांनी निवडणुकीला ‘लोकशाहीचा उत्सव’ न मानता तो एक ‘व्यवसाय’ समजला आहे. “लोकांची मते विकत घेता येतात” या अहंकारातून कोट्यवधी रुपये वाटले गेले. यामुळे प्रामाणिक आणि कष्टाळू कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवणे आता अशक्य झाले आहे. ही प्रथा जर अशीच सुरू राहिली, तर भविष्यात केवळ धनदांडगेच सत्तेवर बसतील आणि सामान्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडले जातील.

पराभवाचा बदला: रस्ते नांगरणे आणि दहशतीचे वातावरण
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, पराभव झाला म्हणून काही उमेदवारांनी चक्क शेत रस्ते नांगरून टाकले किंवा वहिवाटीचे मार्ग बंद केले. “माझ्या जागेतून जायचे नाही” अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांची अडवणूक केली जात आहे. ज्या मतदारांकडे कालपर्यंत हात जोडून मते मागितली जात होती, त्यांनाच आज धमकावले जात आहे. हा प्रकार म्हणजे ‘लोकशाहीचा पराभव’ नसून ‘मानुसकीचा अंत’ आहे. मंचर मधील बऱ्याच प्रभागांमध्ये पराभूत उमेदवार यांनी अशा पद्धतीने रस्ते बंद केले असून याचा त्रास सर्वसामान्य नागरिक भोगत आहेत आता यामध्ये नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक नगराध्यक्षांनी मध्यस्थी करून मार्ग काढावेत आणि रस्ते खुले करावेत अशी मागणी मंचरचे नागरिक करत आहेत.

निवडणूक हा व्यापार नाही जर तुम्ही पैसे वाटून मते मिळवू पाहत असाल, तर तुम्ही लोकशाहीचा अपमान करत आहात. त्यामुळे पराभव झाल्यावर मतदारांना दोष देणे पूर्णपणे चुकीचे आहे. रस्ते बंद करणे किंवा शेत रस्ते नांगरणे हा गुन्हा आहे. वैयक्तिक रागापोटी सार्वजनिक सुविधेवर गदा आणणे हे कोणत्याही सुसंस्कृत समाजात बसणारे कृत्य नाही.
पैसे घेऊनही मतदारांनी नाकारले, चिडचिडीचे मुख्य कारण
अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी मतदारांच्या हातात लक्ष्मी टेकवली, दारूच्या पार्ट्या दिल्या आणि जेवणावळी उठवल्या. उमेदवारांना खात्री होती की पैसा दिलाय म्हणजे मतदान होणारच. पण मतदारांनी पैसे घेऊनही आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने मतदान केले. हा झालेला पराभव उमेदवारांच्या जिव्हारी लागला आहे कारण त्यांचा ‘गुंतवणुकीचा गणित’ चुकला आहे. यातूनच आता मतदारांना शिवीगाळ करणे आणि दिलेले पैसे परत मागण्याचे लाजिरवाणे प्रकार घडत आहेत. ‘पैसे वाटून निवडून येण्याची’ ही प्रथा भविष्यात गावचा विकास खुंटवणारी ठरेल, कारण निवडून आलेला प्रतिनिधी सेवा करण्याऐवजी आधी आपला खर्च वसूल करण्याकडे लक्ष देईल. मंचर नगरपंचायतीच्या या निकालाने हे सिद्ध केले आहे की, जनता आता केवळ पैशांवर विकली जात नाही. मात्र, पराभूत उमेदवारांनी केलेली ही ‘सूडाची खेळी’ अत्यंत निंदनीय आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, रस्ते बंद करणाऱ्या आणि मतदारांना धमकावणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे काळाची गरज आहे. अन्यथा, निवडणुकीतील हा पैशांचा खेळ गावाच्या शांततेला आणि एकतेला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही.











