
आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथे नदीत बुडून एका ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २७ डिसेंबर २०२५) सकाळी उघडकीस आली आहे. वैभव बबन कडुसकर (वय ४६, रा. साकोरे, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा सिध्देश वैभव कडुसकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ९.१० वाजण्याच्या सुमारास सिध्देश कडुसकर हे मंचर येथे असताना त्यांना त्यांच्या आत्याचा मुलगा पवन सुरेश गाडे (रा. साकोरे) यांचा फोन आला. फोनवर पवन गाडे यांनी साकोरे येथील केटी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर वैभव कडुसकर यांची मोटारसायकल उभी असून बाजूला पॅन्ट व चप्पल पडलेली दिसत असल्याची माहिती दिली. तसेच नदीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह दिसत असल्याचे सांगितले.

ही माहिती मिळताच सिध्देश कडुसकर तातडीने साकोरे येथील केटी बंधाऱ्यावर पोहोचले. तेथे त्यांनी पाहणी केली असता, बंधाऱ्याच्या बाजूला वैभव कडुसकर यांची मोटारसायकल उभी होती तसेच त्यांचे कपडे व चप्पल आढळून आले. बंधाऱ्याखाली नदीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पवन सुरेश गाडे, आशिष सुधीर शिंदे, अजित साहेबराव मोढवे, प्रथमेश शिवाजी काळे व संतोष अनंथा मोढवे यांच्या मदतीने वैभव कडुसकर यांचा मृतदेह नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, मंचर येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. मयताचा मृत्यू नदीच्या पाण्यात पडून बुडाल्यामुळे झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेची नोंद मंचर पोलीस ठाण्यात कऱण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनवे करत आहेत.












