
पारगाव, शिंगवे (ता. आंबेगाव) येथे एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका ज्योती बाळासाहेब भागवत यांना रस्त्यात सापडलेले दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र त्यांनी संबंधित महिलेचा शोध घेऊन तिला परत केले असून ज्योती भागवत यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पारगाव येथील येथील माजी सैनिक मेजर विजय कांताराम ढोबळे यांचे दिनांक २२ रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या अंत्यविधी दिनांक २३ रोजी पारगाव येथे होता. अंत्यविधीसाठी गावडेवाडी येथील सुजाता भगवान गावडे या पारगाव येथे आल्या होत्या. त्यांनी गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून पाकिटात ठेवले होते. अंत्यविधीवरून जाताना ते पाकीट कोठेतरी गहाळ झाले. पारगाव येथील आधार हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ज्योती भागवत कामाला येत असताना त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर रस्त्यावर एक पाकीट आढळून आले. त्यांनी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सहकारी कर्मचाऱ्यांना ही बाब सांगितली.

सर्वांनी पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र व काही रोख रक्कम होती. ज्योती भागवत यांच्या सहकारी परिचारिका मंगल लबडे यांनी गावातील सर्व व्हॉट्स ग्रुपमध्ये पाकिटाचे फोटो पाठविले. मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सुजाता गावडे यांनी मंगल लबडे यांना फोन केला, त्यानंतर त्याची ओळख पटली. पाकिटामध्ये सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व काही पैसे होते. बुधवारी (ता. २४) दुपारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शैलजा शिवाजीराव ढोबळे तसेच माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे व सुजाता गावडे यांनी आधार हॉस्पिटलमध्ये जाऊन ज्योती भागवत यांच्या प्रामाणिकपणाबद्दल काही रोख रक्कम तसेच साडी देऊन सत्कार केला. यावेळी आधार हॉस्पिटलचे डॉ. स्मिता चव्हाण, दत्तात्रेय टाव्हरे, बाळासाहेब भागवत, निवृत्ती कापडी आदी उपस्थित होते.











